तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
Posted in gn on Mar 12, 2014
नानासाहेबांचे विचार जगासाठी प्रेरणादायी – ना. गणेश नाईक
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य हे जगासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे मत तैलचित्र प्रदर्शन भेटी प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. धर्माधिकारी कुटुंबीयांनी केलेल्या नि:स्वार्थ सामाजिक कार्याचे तैलचित्र प्रदर्शन कळवा-ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट दिली. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या थोर विभूतींच्या माध्यमातून एक फार मोठा समाज घडला. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून या समाजाला उत्तम दिशा देण्याचे व नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याचे महान कार्य अविरतपणे चालत आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व धर्माधिकारी परिवारांनी केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्य तैलचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रुपेश म्हात्रे, ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांनी सामाजिक सेवा संस्थांनी, शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या तैलचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, प्रौढ साक्षरता, महिलांवरील अत्याचार या बदल जनजागृती करत रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्य वाटप या धर्माधिकारी कुटुंबाने केलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.