Navi Mumbai Krida Sankul
Posted in Events on Jan 12, 2014
नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा
गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार
२२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०१४ हा क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा ठरला आहे, असे गृहमंत्री पाटील म्हणाले.
जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात आयोजित नवी मुंबई क्रीडा महोत्सव २०१४ चे उद्घाटन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या शुभहस्ते झाले.राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जामंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाचे आयोजक तथा ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक, ठाणे लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त ए.के. शर्मा , नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपमहापौर अशोक गावडे तसेच नवी मुंबईतील लोक प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडा रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत या महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पार पडला. त्यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना गृहमंत्री आर. आर. पाटील बोलत होते.
उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी नवी मुंबईतील १८ शाळांच्या विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन करून मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा ध्वजारोहण झाले. समतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सदर केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले कि, १९९२ साली आमदार चषकाच्या माध्यमातून सुरु झालेला हा महोत्सव अधिकच ग्लोबलाईज होऊन त्याचे महोत्सवात रुपांतर झाल्याबद्दल आयोजक संदीप नाईक आणि नवी मुंबई क्रीडा संकुल व जीवनधारा वार्ड सल्लागार समिती- क्रीडा यांच्या सर्व सहकार्यांचे कौतुक केले. सर्व धर्म समभाव, शांती व समतेची शिकवण देणारे नवी मुंबई शहर अशा प्रकारच्या उपक्रमांतून भविष्यात क्रीडा नगरीचे शहर म्हणून ओळखले जाईल त्याचबरोबर या महोत्सवातून ऑलंपिकच्या दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नेत्रदीपक आणि शिस्तबद्ध अशा या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. सायबर नगरी, मेट्रो सिटी म्हणून ओळख असणारी नवी मुंबई ही महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे खेळाडू व क्रीडापटू घडविणारी नगरी म्हणून ओळखली जाईल असे गृहमंत्री पाटील म्हणाले. शालेय विद्यार्थ्यांच्या संचालनाबद्दल बोलताना नामदार पाटील म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांनी केलेले संचलन हे पोलिसांना देखील शिस्तीचे महत्व पटवून देणारे ठरेल. आजच्या युगात तरुण पिढी ही संस्काराअभावी वाममार्गाकडे जात असल्याकडे गांभीर्याने लक्ष वेधत तरुण पिढीमध्ये संस्काराची रुजवण करताना ज्या ठिकाणी शासन कमी पडते त्या ठिकाणी समाजाने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आ.संदीप नाईक यांनी विशेष पुढाकार घेऊन खेळासाठी जास्तीत जास्त मैदाने उपलब्ध करून खेळाडू घडवावेत असे आवाहन केले.
नवी मुंबईतच नव्हे तर देश व राज्य पातळीवर नावाजला गेलेला व क्रीडा क्षेत्राला विविध क्रीडा प्रकाराने जोडणारा उपक्रम म्हणून हा क्रीडा महोत्सव नोंदला गेला आहे. यावर्षी ८ ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत या महोत्सवात विविध स्पर्धा रंगणार आहेत. नवी मुंबई क्रीडा महोत्सव -२०१४ मध्ये कबड्डी , खो-खो, फुटबॉल क्रिकेट, ४० प्लस क्रिकेट अशा विविध ४६ क्रीडा प्रकारचा हा क्रीडा महोत्सव आहे. यावर्षीच्या महोत्सवात १५० शाळांमधील १४ हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे १२ जानेवारी रोजी सामाजिक संदेश देणारी म्यरेथोन स्पर्धा ही होय. या म्यरेथोन स्पर्धेत विविध गटांबरोबरच शालेय शिक्षक आणि पत्रकारांच्या गटाचा समावेश केल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव भविष्यात जास्तीत जास्त राबवून नवी मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमदार नाईक यांनी पत्रकारांबरोबर बोलताना व्यक्त केला.