Job Fair 2014
‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ
२३८७ उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या
युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक
नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले.
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्यावतीने कोपरखैरणे सेक्टर ७ मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक -३१ व ३२ च्या पटांगणात आज आयोजित केलेल्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर -२०१४ ‘ चा लाभ तब्बल ७ ते ८ हजार उमेदवारांना झाला. तर २३८७ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळाल्या. नवी मुंबईतला हा ४ था रोजगार मेळावा यशस्वीपणे आणि शिस्तबद्धपणे पार पडला. पालकमंत्री नामदार नाईक यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित युवा वर्गाला पालकमंत्री ना. नाईक यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मेळाव्याचे आयोजक आणि जीवनधारा रोजगार, व्यापार आणि उद्योग समितीचे मुख्य समन्वयक आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, नगरसेवक, नगरसेविका, ‘ जीवनधारा ‘ वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार, उद्योग तसेच ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत अन्य समित्यांचे पदाधिकारी, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आजवर शिक्षणात क्रांती झाली आहे परंतु योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकांना पदवी धारण करूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या वाटा शोधणाऱ्या इच्छुक तरुण- तरुणींमध्ये निराशा येत असे. बेरोजगारीची गंभीर समस्या पाहता ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत रोजगार,व्यापार आणि उद्योग समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यातून आजवर हजारो युवक- युवतींना रोजगार मिळाला आहे, हि एक यशाची गुरुकिल्लीच आहे. बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरून आत्मविश्वासाबरोबरच नैतिक शक्ती देखील युवकांनी आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यापारी वृत्ती असणाऱ्या युवकांकरिता स्वतंत्र रोजगार केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उमेदवारांना यशस्वी मुलाखतीसाठी मेळाव्यात बहुमुल्य मार्गदर्शन केले. मुलाखतीच्या तयारी विषयीची मार्गदर्शन पुस्तिका वितरीत करण्यात आली. सुप्रसिद्ध समुपदेशक सुनील रायकर यांनी उमेदवारांना करियरविषयी उपयुक्त आणि सोप्या भाषेत उमजेल, असे मागदर्शन केले.
‘ मेगा जॉब फेअर २०१४ ‘ ज्याठिकाणी भरणार होता त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक- ३१ व ३२ च्या प्रवेशद्वारावर एक मोठा मार्गदर्शक माहिती फलक उभारण्यात आला होता. त्यावर ‘ जॉब फेअर ‘ मध्ये सहभागी कंपन्यांची नावे, त्या कंपन्यांमधील उपलब्ध पदे, त्यांना देय असलेले वेतन आदींचा सविस्तर तपशील या सूचना फलकावर देण्यात आला होता. त्यामुळे रोजगार मेळावा स्थळी प्रवेश करतानाच उमेदवाराला आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याची माहिती मिळाल्याने मदतीचा हात मिळाला. या अभिनव संकल्पनेचे पालकांनी कौतुक केले.
जीवनधाराच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देणारा ग्रीन होप, एस.एस.सी सराव परीक्षा, क्रीडा महोत्सव, नाट्य व चित्रकला स्पर्धा, दाखले वाटप आदी महत्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. सलग चौथ्या वर्षी हा यशस्वी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो आहे, असे समन्वयक आ.संदीप नाईक यांनी मार्गदर्शनपर भाषणात बोलताना सांगितले. या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळविण्यास अपात्र ठरलेल्या उमेदवारांना रोजगार सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या आधारे कंपनीचे नाव व तेथील माहिती दिली जात असल्याचे आ.नाईक यांनी सांगितले. ‘कम्युनिकेशन स्कील आणि व्यक्तीमत्व विकास’ याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्यातील उणीवा दूर केल्या जाणार आहेत. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना मदत मिळणार असून त्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील आ.नाईक यांनी केले. ‘आधुनिक सिटी’ म्हणून नावाजलेल्या नवी मुंबईतील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही यासाठी ‘जीवनधारा’ च्या माध्यमातून भविष्यात अभिनव संकल्पना राबविण्याचा मानस ना.नाईक यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया
मी ठाण्यातील खारीगाव येथील देवता कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करीत आहे. नोकरी करीत असताना मला चांगली नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होती. या रोजगार मेळाव्यात मी आल्यानंतर मला तात्काळ माझ्या भविष्याला उज्ज्वल करणारी नोकरी मिळाली. नेरूळ येथील एस.एस.हायस्कूलमध्ये मला मनासारखी नोकरी मिळावी याचा खूपच आनंद आहे. मी पालकमंत्री ना. गणेश नाईकसाहेब यांची आभारी आहे. – अरुणा देशमुख, रा. ऐरोली, उमेदवार
बारावी अनुत्तीर्ण आहे. परंतु मला नेहमीच चांगले काही करता यावे या उद्देशाने मी आयटी तंत्रावर आधारित अल्पकालीन प्रशिक्षण घेतले. गेल्या अनेक महिन्यांपासून मी नोकरी शोधली मात्र हाती निराशा आली. या रोजगार मेळाव्यात एकाच छत्राखाली रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या होत्या. मी राहत असलेल्या रबाळे परीसरानजीकच्या भारत बिजली कंपनीत मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. – संतोष रावले, रा.रबाळे, उमेदवार
मी सर्वसाधारण कुटुंबातील आहे. मला काही तरी करायचे स्वप्न होते. त्या अनुषंगाने मी एमएससी मायक्रो-बायोलॉजीचे प्रशिक्षण पूर्ण केले. ठाण्यातील एका कंपनीत मी नोकरी देखील करीत होते. नवी मुंबईसारख्या औद्योगिक नगरीत मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होते. ‘जीवनधारा’ च्या या रोजगार मेळाव्यात मी आल्यानंतर मला तात्काळ रबाळे येथील Galanty फार्मा कंपनीत मनासारखी नोकरी मिळाली याचा मला खूपच आनंद आहे. -मनीषा साठे, रा.ऐरोली, उमेदवार
मी एक गृहिणी आहे. माझे शिक्षण ९ वी झाल्यानंतर मला पुढे शिक्षण घेता आले नाही. माझ्या लग्नानंतर माझी काम करीत शिकण्याची इच्छा पूर्ण करीत असून आता मी बारावीत आहे. कमी शिक्षण असल्यामुळे मला चांगली नोकरी मिळाली नव्हती. यापूर्वी मी अनेक ठिकाणी काम केले परंतु रोजगार मेळाव्यात आल्यानंतर मला नामांकित पटनी कंपनीत हाऊस कीपिंग सुपरवायझरची नोकरी पुन्हा मिळाली आहे. – साधना गाळव, रा.ऐरोली, उमेदवार
नोकरीची आवश्यकता सर्वांना असते. ‘जीवनधारा’ च्या रोजगार मेळाव्यात नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. प्रत्येकाच्या आशा पूर्ण करणारा असा हा रोजगार मेळावा आहे. खरोखरच पालकमंत्री नामदार गणेशजी नाईकसाहेब यांनी बेरोजगारांसाठी राबविलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. – सचिन जयस्वाल, उमेदवार
१२ वी नंतर शिकण्याची खूप इच्छा होती. परंतु मला शिकता आले नाही. बारावीनंतर मी आयटी तंत्रावर आधारित अभ्यास केला. स्वतःहून केलेल्या जिद्दीमुळे मी आयटी तंत्रज्ञान आत्मसात केले परंतु नोकरी मात्र मिळत नव्हती. या मेळाव्यात आल्यानंतर चांगल्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली आहे. सी-वूड येथील Safron Technology मध्ये आयटी क्षेत्राशी संबंधित नोकरी लागली आहे. ‘जीवनधारा’ चा हा रोजगार मेळावा माझ्यासाठी लकी ठरला आहे.
-महताप अलाप, रा.कोपरखैरणे, आयटी उमेदवार.