महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करावी
Posted in News on Aug 8, 2014
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश
नवी मुंबईकरांना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जीर्णावस्थेतील विद्युत पोल, उघड्या डीपी, खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याची महावितरणाने तात्काळ दाखल घेऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील, तसेच एमआयडीसी परिसरातील विद्युत विभागाच्या समस्यांची सोडवणूक करावी. त्यासाठी महावितरणाने आपली स्वतंत्र यंत्रणा अपडेट करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पालकमंत्री ना. नाईक यांचा जनता दरबार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील गावठाण आणि झोपडपट्टीसारख्या भागालाही २४ तास विद्युत पुरवठा व्हावा यासाठी आ. संदीप नाईक यांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद त्याच बरोबर लेखी निवेदन सादर करून पाठपुरावा सुरु केला आहे.
त्या अनुषंगाने आज (ता.७) गुरुवारी वाशी येथे झालेल्या जनता दरबारात आ. संदीप नाईक यांनी नवी मुंबईत वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत व खराब झालेल्या डी.पी.बॉक्स, घरांवरती लोंबकळत असलेल्या विद्युत तारा या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री ना. नाईक यांनी महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करीत, नवी मुंबईतील महावितरणची संबंधित समस्यांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. या कामासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रभागवार कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना देखील पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या.
वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी घ्यावे, अशी मागणी जनता दरबारात ना. नाईक यांच्याकडे केली. यासंदर्भात एपीएमसीच्या आस्थापनेसोबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ना. नाईक यांनी सांगितले.
रबाळे एमआयडीसी परिसरातील एल्डर हेल्थ केअर (आर-२८) या कंपनीतील कामगारांचा रखडलेला पगार देण्याच्या सूचना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. दोन दिवसात दोन महिन्यांचा पगार देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कबुल केले आहे. या कंपनीतील कामगारांचा ७ महिन्यांचा पगार रखडला आहे. ना. नाईक यांनी कामगार वर्गाविषयक घेतलेल्या चांगल्या भूमिकेबाबत एल्डर कंपनीच्या कामगारांनी पालकमंत्री ना. नाईक यांचे आभार मानले.
अनधिकृत रिक्षा स्टॅन्डवर कारवाई करा – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी अनधीकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आरटीओ प्रशासनाला दिल्या. नवी मुंबईतील विविध रिक्षा युनियन्स संदर्भातील प्रश्नांवर बोलताना ना. नाईक म्हणाले कि, शहरातील रिक्षा स्टॅन्डवरील युनियनच्या नाम फलकावर कोणताही पक्ष अथवा युनियनच्या पुढाऱ्याचा फोटो असेल , तर तो तातडीने काढण्याची कारवाई आरटीओ ने करावी. शहरात अनधिकृत रिक्षा स्टॅन्डमुळे प्रवाशांना त्रास होत असेल तर आरटीओच्या परवानगीशिवाय असलेले रिक्षा स्टॅन्ड बंद करावेत, अशा सूचना ना. नाईक यांनी आरटीओ प्रशासनाला केल्या.