पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार
Posted in News on Aug 5, 2014
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश
- महापालिकेच्या आगामी महासभेत ठराव येणार
- सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या आणि विविध ठेकेदारांमार्फत पालिकेच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ९५०० विविध संवर्गातील कामगारांसाठी शुभवर्तमान असून या कामगारांना कायम करण्याचा ठराव पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार ८ ऑगस्ट २०१४ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची बैठक घेऊन या कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी कंत्राटी कामगारांना नेहमीच सामाजिक न्याय प्रदान केला आहे. या कामगारांना समान कामास समान वेतन मिळवून दिले आहे. पीएफ, बोनस, ग्रॅज्यूईटी, आदींचा लाभ त्यांना मिळतो आहे. मात्र गेली अनेक वर्षे कार्यरत असूनही हे कामगार कायम झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना सामाजिक स्थैर्य लाभलेले नाही. साफसफाई, पाणीपुरवठा, मल:निसारण, स्मशानभूमी, डंपिंग ग्राउंड, उद्यान, हिवताप नियंत्रण, मूषक नियंत्रण, कोंडवाडे, परिवहन, रुग्णालये, शिक्षक, बहुउद्देशीय कामगार, ठोक मानधनावरील कामगार, मॅकेनिकल व इतर सर्व संवर्गातील कामगारांनी त्यांच्या कामाची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. सफाई खात्यात २८६०, पाणीपुरवठा खात्यात ४५०, मलनिस्सारण खात्यात २३८, परिवहन उपक्रमात ९६९, उद्यान विभागात ४१५ इत्यादी सर्व खात्यांत मिळून कंत्राटी कामगारांचा आकडा सुमारे ९५०० आहे. कंत्राटीचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी ठेकेदार बदलला तरी कामगार बदलता कामा नये हे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचे कामगारहिताचे धोरण अवलंबले आहे. या कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यावर साधकबाधक चर्चा घडवून आणल्यानंतर तो ठराव मंजूर करून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडे हा ठराव आल्यानंतर स्वतः पालकमंत्री नामदार गणेश नाईक हे मंत्रालयीन स्तरावर संबंधित विभागांची बैठक आयोजित करून या ठरावास मान्यता घेणार आहेत. त्यामुळे या हजारो कामगारांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असाच ठरणार आहे. हा ठराव मंजूर होईपर्यंत या कामगारांचा बेसिक पगार आणि भत्ते वाढविण्याची सूचना देखील पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.
कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या पालिकेच्या ठरावास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार आणि नवी मुंबई महापालिकेचे प्रथम महापौर डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केली आहे. हि मंजुरी न मिळाल्यास प्रसंगी कामगारहितास्तव राज्य शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका त्यांनी बोलून दाखविली आहे. या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
गेली अनेक वर्षे मी सफाई खात्यात इमाने इतबारे नोकरी करीत आहे. नामदार गणेश नाईक यांच्यामुळे आमची नोकरी टिकली असून अनेक लाभही मिळाले आहेत मात्र नोकरीत कायम नसल्याने आयुष्यात स्थैर्य नाही. आता कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून समाधान झाले आहे. – जगदीश म्हात्रे , सफाई कामगार कोपरखैरणे
आम्हाला नोकरीत कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी नेहमीच सर्वसामान्य कामगारांचे हित जोपासले आहे. नामदार नाईक आम्हाला कायम करून न्याय देतील, असा विश्वास आहे. – नरेंद्र वैराळ , कामगार, पाणीपुरवठा विभाग
पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या कल्याणकारी धोरणानुसार समान कामास समान वेतन देणारी नवी मुंबई महापालिका हि राज्यातील पहिली महापालिका आहे. या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक क्रांतीच आहे. – रमाकांत पाटील , कार्याध्यक्ष , नवी मुंबई म्युनिसिपल युनियन