नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीयांकडून सन्मान
Posted in News on Jul 26, 2014
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला
ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षात अविरतपणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडल्या. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील ७ महानगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती करिता दूरदृष्टी विकासाचे नियोजन करत नवनवीन योजना राबविल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. २५ जूलैला झालेल्या शेवटच्या नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय खासदार, आमदार आणि सदस्यांनी पालकमंत्री ना. नाईक यांचे आभार मानले. जिल्ह्याच्या नियोजनाबाबत सर्वांगीण विकासाची भूमिका मांडणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्यातील एकमेव पालकमंत्री असल्याची भावनाही यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.
पाच वर्षातील आढावा आणि मागील इतिवृत्तांचा आणि आर्थिक नियोजनाचा आढावा घेत ठाणे जिल्हा नियोजन समितीची आजची सभा ठाण्यातील नियोजन भवनात पार पडली. या बैठकीला खा. कपिल पाटील, आ. संदीप नाईक, आ. निरंजन डावखरे, आ. गणपत गायकवाड, आ. प्रकाश भोईर, आ. विष्णू सावरा, आ. किसन कथोरे, आ. विवेक पंडित, आ. रामनाथ मोते, आ. प्रताप सरनाईक, आ. एकनाथ शिंदे, माजी आ. रामनाथ मोते, ठाण्याचे पालक सचिव के.पी.बक्षी, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नाईक यांनी आजच्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा सदस्यांकडून जाणून घेतला . सदस्यांनी आपल्या तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष ना. नाईक यांच्याकडे दिली. पालकमंत्री ना. नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मागील वर्षात झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्याचा विकास करताना सर्वांना सामावून घेतल्याने ग्रामीण असो वा नगरपालिका, महानगरपालिका परिक्षेत्र यातील नागरिकांना आपण न्याय देऊ शकल्याची भावना व्यक्त केली. नियोजन समितीकडे असणारा निधी, शासनाच्या विविध प्राधिकरणाकडून प्रस्तावित कामांसाठी व योजनांसाठी आलेला निधी यातून जिल्ह्याला एक वेगळा आयाम देण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधानी असल्याचेही पालकमंत्री ना. नाईक म्हणाले. आजच्या बैठकीत आ. प्रताप सरनाईक, आ. विवेक पंडित, आ. किसन कथोरे, आ.विष्णू सावरा यांनी ५ वर्षात पालकमंत्री ना. नाईक यांनी नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय पूर्ण केल्याबाद्द्दल त्याच बरोबर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ना. नाईक यांचे शब्दरूपी आभार मानले. पालकमंत्री ना. नाईक पुढे म्हणाले कि, भाईंदर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. तसेच शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा कृषी विभागाने उभारावी. जिल्हा परिषदेने रस्ते, पाणी, शाळा संदर्भात सुरु केलेली कामे त्वरित पूर्ण करावीत.
याच बैठकीत आदिवासी उपयोजने अंतर्गत सुरु असलेली कामे सुरु करणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्व्हेक्षण करणे, मुलांच्या वसतिगृहाची सोय करणे, विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश देणे, आदिवासी भागातील शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न, विना अनुदानित शाळांना अनुदान , घोडबंदर किल्ला दुरुस्ती, क्लस्टर डेव्हलपमेंट, लघुपाटबंधारे प्रकल्पाची कामे अशा अनेक विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्याला मोनो-मेट्रोने जोडा – आ. संदीप नाईक
सदस्य मुकेश म्हात्रे यांनी भिवंडी ते कल्याणला मोनो आणि मेट्रो सेवेने जोडण्याची मागणी सदस्यांनी केली होती. तर आ. संदीप नाईक यांनी ठाणे, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याला मोनो व मेट्रो सेवेने जोडण्याची मागणी केली. या संदर्भात बोलताना पालकमंत्री ना. नाईक यांनी मुंबई शहरात सुरु झालेली मेट्रो आणि मोनो सेवाही नियोजन अभावी तोट्यात चालली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात मोनो रेल्वे सुरु करताना नियोजन आणि अधिक वापर होणाऱ्या ठिकाणांची निवड करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या संदर्भातील आढावा घेण्याकरिता येत्या बुधवार ३० जुलै रोजी मंत्रालयीन स्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.