आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा
Posted in News on Jul 29, 2014
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे आवाहन
बोनकोडेतील पहिल्या महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ
मागील केंद्रातील युपीए सरकारने तसेच राज्यातील विद्यमान आघाडी सरकारने लोकहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्यदायी योजना, युपीए सरकारची अन्नसुरक्षा योजना या सर्वसामान्यांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांतील राज्यातील आघाडी सरकारचे काम कौतुकास्पद असून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व ज्येष्ठ समाजसेवक मुकुंद नाईक यांच्या पुढाकाराने बोनकोडे येथील शिवशक्ती कार्यालयासमोरील कै. बी.एफ. नाईक निवास येथे पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते महा ई सेवा केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, ई सेवा केंद्राचे संचालक मुकुंद दत्तात्रय नाईक,सुरेश दादा नाईक, रमाकांत नाईक,दत्तात्रय बाबुराव नाईक, अशोक नाईक, परिवहनचे माजी सभापती हनुमंत दळवी, नगरसेवक प्रभाकर कांबळे, गजानन दळवी, नगरसेवक कोंडीबा तिकोणे, सुरेश सालदार, फकरुद्दीन पटेल, जीवनधारा समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. नाईक म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या असणाऱ्या योजना पोहोचाव्यात. तथा अतिअल्प गटातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने राजीव गांधी आरोग्यदायी योजना अमलात आणली आहे. आघाडी सरकारने शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातही अन्न सुरक्षा योजना आणून गोरगरीब जनतेला अल्प दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. अशा विविध योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जनतेकरिता अमलात आणल्या आहेत.या महा ई सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना विविध योजनाचा लाभ घेत यावा तथा आपण भारतीय असल्याची आपली एक ओळख असावी या उद्देशाने पॅन कार्ड, बँकेच्या सुविधा शासकीय दाखले, विजेची बिले अशा विविध कामासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या केंद्राच्या मार्फत नागरिकांना लवकर मिळणार आहे.
बोनकोडे येथील महा- ई- सेवा केंद्रा अंतर्गत भारत सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना, उम्मीद रोजगार, पॅन सुविधा, बँकिंग सुविधा, आधार कार्ड, विविध शासकीय दाखले, प्रतिज्ञा पत्र व ७/१२ चा उतारा, सर्व प्रकारचे मोबाईल अथवा डी. टी. एच रिचार्ज सुविधा, वीज बिल भरणा केंद्र, विमा योजना इत्यादी संदर्भात विविध शासकीय दाखले उपलब्ध होणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.