स्त्रीभृणहत्या रोखण्यात नवी मुंबईच्या नागरिकांची महत्वपूर्ण कामगिरी
Posted in News on Jul 18, 2014
जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवोद्गार
नवी मुंबईच्या नागरिकांनी स्त्रीभृणहत्या रोखण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली म्हणूनच नवी मुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाल्याची भावना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केली. वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका, सिडको, पोलीस प्रशासनाचे अधिकारी वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्त्रीभृणहत्या मोहीम जोरदारपणे राबवून दुसरा क्रमांक पटकावला. या संदर्भाने पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते आरोग्य अधिकारी डॉ. आर.डी. निकम यांचा सत्कार केला.
आजच्या जनता दरबारात परिचारिकांना मनपाच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी सामावून घेणे, कलिंगड विकणाऱ्या व्यापाऱ्यांना पर्यायी भूखंड देणे, तसेच सिडको, मनपा, शिक्षण विभाग, पोलीस विभाग संदर्भात तक्रारींवर चर्चा करण्यात येउन त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले. नवी मुंबई महापालिकेतील कामगारांना समान काम तत्वावर वेतन दिले जाते. तेच वेतन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कामगारांना देण्यात येईल, तसेच कायद्याच्या कक्षेत राहून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले. नवी मुंबई महापालिकेत ठेका पद्धतीने गेल्या १५ ते २० वर्षापासून सेवेत असणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील पंप ऑपरेटर यांनी आपल्या समस्या पालकमंत्री ना. नाईक यांच्या समोर मांडल्या. तसेच त्यांच्या वेताणाचाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. या कामगारांच्या प्रश्नांवर पालकमंत्री ना. नाईक यांनी ‘ समान काम समान वेतन ‘ तत्वानुसार यांनाही वेतन देण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच कायद्याच्या कक्षेत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडून भाडेतत्वावर सानपाडा प्रभाग क्रमांक ६४ येथे फेरीवाल्यांसाठी भूखंड घेतला होता. येथे गेल्या १५ वर्षापासून अधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत आहेत.मात्र लिझ संपल्यामुळे सिडकोने या भूखंडावरील फेरीवाल्यांना कारवाईची नोटीसा दिल्या आहेत. मात्र फेरीवाल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची खबरदारी पालिकेने घेत, भूखंड कायमस्वरूपी महापालिकेकडे वर्ग करण्याची कारवाई करावी असे निर्देश ना. नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.