सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा

Posted in News on Feb 11, 2014

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या पुढाकाराने ‘पंचरत्न’ मधील सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा

नवी मुंबई प्रतिनिधी

पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या पुढाकारामुळे नेरूळच्या पंचरत्न सोसायटीमधील गस सिलिंडर बाधित कुटुंबांना सिडकोने त्यांच्या उलवे येथील उन्नती या गृहनिर्माण प्रकल्पात निवारा देण्याचे मान्य केले आहे. गुरुवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या जनप्रतीनिधींच्या विशेष दरबारात नाईक यांनी हा विषयउपस्थित करून या इमारतीमधील रहिवाशांना निवारा देण्याचे सिडकोकडून मान्य करून घेतले.

नेरूळच्या सेक्टर-१६ मध्ये असलेल्या पंचरत्न या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रवींद्र तोंडवळकर यांच्या घरात सिलिंडरचा भीषण स्फोट 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला होता. या भयंकर दुर्घटनेत दोनजण ठार तर उर्वरित १२ रहिवासी जखमी झाले होते. या स्फोटामुळे पंचरत्न सोसायटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या इमारतींमधील कुटुंबांना नाइलाजास्तव उघड्यावर राहावे लागत आहे. या इमारतीचे सध्या  स्ट्रक्चरल ऑडीट सुरु आहे. गॅस गळतीच्या भितीने हि कुटुंबे या इमारतीत परत जाण्यास कचरत आहेत. या रहिवाशांची व्यथा जाणून जनाप्रतीनिधींच्या दरबारात पालकमंत्री नामदार नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय – संचालक संजय भाटीया यांच्यासमोर हा विषय उपस्थित केला. अशा प्रकारच्या बाधितांसाठी सिडकोने निवारा केंद्रे बांधायला हवीत, त्यासाठी सिडकोने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. मात्र तोपर्यंत पंचरत्न सोसायटीमधील बाधित कुटुंबांना लवकरात लवकर योग्य निवारा देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. नामदार नाईक यांच्या या मागणीवर उत्तर देताना व्यवस्थापकीय -संचालक संजय भाटीया यांनी पंचरत्न मधील या कुटुंबांना सिडकोच्या उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पात निवारा देण्याचे मान्य केले. हे रहिवासी लगेचच तेथे राहण्यास जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.

नामदार नाईक यांच्या मागणीनंतर सिडकोने घेतलेल्या निर्णयाचे पंचरत्न सोसायटीमधील रहिवाशांनी स्वागत केले आहे. सोसायटीचे अध्यक्ष काशिनाथ थोरात म्हणाले की,ही आमच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. आम्हाला समाधान आहे की, पालकमंत्री नामदार नाईक यांनी आमचा विषय जनप्रतीनिधींच्या दरबारात उपस्थित करून सिडकोकडून आमच्यासाठी निवाऱ्याची सोय करून घेतली आहे.

पंचरत्न सोसायटीमधील आणखी एक रहिवासी सुमित बागल यांनी देखील या निर्णयाविषयी समाधान व्यक्त केले आहे. सिलिंडर स्फोट दुर्घटनेनंतर आमची कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत. उन्नतीमध्ये निवारा मिळाल्याने आम्ही थोडेफार निश्चिंत झालो आहोत. पालकमंत्री नामदार नाईक आणि सिडकोचे आम्ही आभार मानतो.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube