वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार
Posted in News on Jan 21, 2014
वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार
पालकमंत्री ना.गणेश नाईक यांचा निर्धार
पहिल्या प्रभाग बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
निवेदनांवर कार्यवाहीचा आढावा प्रभाग बैठकीत प्रभागातील रहिवाशांनी त्यांच्या समस्यांची निवेदने बैठकस्थळी ठेवण्यात आलेल्या तक्रारपेटीत टाकली. हि निवेदने संबंधित विभागाला पाठविण्यात येणार आहेत. निवेदनकर्त्या व्यक्तीने दिलेल्या निवेदनांवर काय कार्यवाही झाली याचा आढावा जनता दरबारात घेण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर रेल्वे रुळांच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याची सूचना सिडकोला केली आहे, यामुळे रेल्वेरुळांवर होणारे अपघात टळतील असे पालकमंत्री ना.गणेश नाईक म्हणाले.
नवी मुंबई | प्रतिनिधी
वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून आगामी सात वर्षांत विकासकामे पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईला सिंगापूर आणि दुबईसारखे रूप प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. नामदार नाईक यांची प्रभागनिहाय बैठकांची मालिका नागरिकांच्या आग्रहास्तव आजपासून सुरु झाली. आज वाशीमधील प्रभाग क्रमांक ५१ मधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सेक्टर १५ -१६ मधील कै.मिनाताई ठाकरे क्रीडा मैदानावर नवी मुंबई कालची, आजची आणि उद्याची या विषयावर नामदार नाईक यांनी आपले उद्बोधक विचार मांडले. जीवनधाराच्या माध्यमातून ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ या उपक्रमाची पहिली बैठक प्रभागातील नागरिकांच्या जबरदस्त प्रतिसादात यशस्वी झाली. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक आणि नगरसेवकवर्ग, जीवनधाराचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक राजू शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सिडकोनिर्मित एलआयजी, एमआयजी आणि कोपरखैरणेतील वसाहतींच्या विकासासाठी क्लस्टर योजना अत्यंत गरजेची असल्याचे मत नामदार नाईक यांनी मांडले. या भागांचा सुनियोजित विकास या योजनेच्या माध्यमातून साधला जाणार आहे. गावठाण, झोपडपट्ट्या आणि सिडकोनिर्मित वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त एफएसआयची मागणी केली असून ती लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. क्लस्टरला होत असलेला विरोध दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याकरिता सोसायटीधारकांनीच आपला विकासक निवडायचा आहे, असे नमूद केले. खाजगी इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मिळालाच पाहिजे, अशी आपली धारणा आहे, असे ते म्हणाले. शहरातील कोंडी सोडविण्यासाठी फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी सिडकोने पालिकेला सुविधा भूखंड लवकरात लवकर हस्तांतरित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
टोलमुक्त ठाणे-बेलापूर मार्गावर आणि पामबीच मार्गावर एमएमआरडीमार्फत प्रस्तावित उड्डाणपुलांच्या निर्मितीला मे अखेरपर्यंत सुरवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर या दोन्ही मार्गांवरील प्रवास अधिक सुरळीत आणि सुखकर होईल, अशी अशा व्यक्त केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एमएमआरडीए सुद्धा विकासकामांचा खर्च उचलणार असून त्यामुळे पालिकेवरील ५०० कोटींचा विकासकामांच्या खर्चाचा भार कमी होणार आहे. वन टाईम प्लानिंग अंतर्गत पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांसाठी सुमारे सात हजार कोटींचा खर्च होणार असून प्रतिवर्षी एक हजार कोटींचा याप्रमाणे पुढील सात वर्षात पालिकेच्या माध्यमातून सात हजार कोटी खर्च होणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात नवी मुंबईतील प्रमुख आणि विविध खात्यांशी संबधीत समस्या जाणून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पामबीच आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी आधुनिक रुग्णवाहिका महापौर सागर नाईक यांच्या पुढाकाराने येणार आहेत त्याचे पालकमंत्री ना. नाईक यांनी कौतुक केले.महिला बचतगटांना प्रोत्साहन म्हणून बचतगटांच्या सदस्या असलेल्या प्रत्येक महिलेच्या बँकखात्यात एक हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.