‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’
Posted in News on Jan 28, 2014
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’ चा शुभारंभ ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची माहिती; ठाणे जिल्ह्यात योजनेचे १० लाख लाभार्थी
नवी मुंबई | प्रतिनिधी
भूक आणि कुपोषण निर्मूलनाचे उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ मंजूर केले. महाराष्ट्र राज्यस्तरावर ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ कार्यान्वित करण्याचा शुभारंभ, दि.३१ जानेवारी रोजी ऐरोली नॉलेज पार्क पटनी कंपनी समोरील मैदानात पार पडणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री ना. शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चावण आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती आज वाशी येथील एनएमएसए येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जामंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ च्या शुभारंभास राज्य मंत्रीमंडळातील इतर मंत्री महोदय आणि शासकीय उच्च अधिकारी वर्ग देखील उपस्थित राहणार आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दहा लाख लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार असल्याचे देखील पालकमंत्री म्हणाले.
या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अंत्योदय अन्न योजने अंतर्गत १५ हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पिवळे कार्डधारक नागरिकांना प्रति महिना ३५ किलो अन्नधान्य मिळणार आहे. यामध्ये प्रति किलो दोन रुपये दराने गहू, ३ रुपये दराने तांदूळ आणि १ रुपये दराने भरड धान्य उदा. ज्वारी, बाजरी , मका इत्यादी उपलब्ध होईल.
दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बीपीएल पिवळे कार्डधारक कुटुंबांना प्रति महिना प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अंत्योदय योजना लाभार्थी दरानेच अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्या कुटुंबांचे उत्पन्न १५ हजार रुपये ते ५९ हजार रुपये प्रति वर्षी आहे. अशा केशरी कार्डधारक कुटुंबांना सध्याच्या म्हणजेच प्रति किलो ९.६० रु. दराने ५ किलो तांदूळ आणि ७.२० रु. दराने १० किलो गहू प्रति महिना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेची सुरुवात प्रथम नवी मुंबईतून करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार त्यास मान्यता मिळाल्याने ३१ जानेवारी रोजी भव्य जाहीर कार्यक्रमाच्या स्वरुपात या योजनेचा शुभारंभ होत असल्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगून या कार्यक्रमात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून १ लाख नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वासही व्यक्त केला. केंद्राची ही योजना राबविली जात असताना संपूर्ण जिल्ह्यात दहा लाख तर नवी मुंबईत ६१ हजार लाभार्थींना त्याचा लाभ होईल. अन्न सुरक्षा अधिनियमाचे कायदे अधिकच कडक असल्याने ही योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले. अनेक घरातील प्रमुख कर्ता व्यक्ती असताना कुटुंबाचे उत्पन्न या योजनेसाठी पात्र नव्हते. मात्र कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर ते पात्र झाले. अशा कुटुंबांना घटलेल्या उत्पन्नानुसार आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका मिळाव्यात आणि या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. नाईक म्हणाले.
या योजनेचा मुख्य आर्थिक भार हा केंद्र सरकार उचलणार असून उर्वरित भार हा राज्य सरकारवर असणार आहे. लोकसभेत सर्व खासदारांनी गांभीर्याने चर्चा करून बहुमताने मंजूर केलेल्या या अधिनियमाबाबत आनंदही पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात १ लाख नागरिक सामावतील, असे मैदान एकमेव ऐरोलीच्या पटनी कंपनीसमोर उपलब्ध असल्याने तेथे हा शुभारंभाचा सोहळा पार पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ७,००,१७,००० (सात कोटी १७ हजार) इष्टांक लाभार्थी पात्र ठरविण्यात येणार आहेत.
देशातील सर्व नागरिकांचे अन्न व पोषणमुल्य यांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकामुळे नागरिकांना परवडेल अशा अत्यंत अल्प किंमतीमध्ये योग्य प्रमाणात अन्न धन्य मिळण्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असून हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या विकासमय वाटचालीतील आणखी एक सकारात्मक पाऊल आहे.
– ना. गणेश नाईक
पालकमंत्री, ठाणे जिल्हा