ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी
Posted in News on Jan 23, 2014
ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी
मुंबई | प्रतिनिधी
मंत्रालयात आज झालेल्या २०१४ -२०१५ च्या ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय सर्वसाधारण बैठकीत पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मागणी केल्याने जिल्यातील विविध विकासकामांसाठी अतिरिक्त निधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये ८४ कोटी ३० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याबाबत अर्थमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीला जिल्हाधिकारी पी वेलरासू आणि विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा सार्वजनिक कार्यान्वयीन यंत्रणांसाठी २७९ कोटी ६४ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा आहे. मात्र बैठकीत या सर्व यंत्रणांमार्फत ३६३ कोटी ९४ लाख अशी मागणी नोंदविण्यात आली . त्यामुळे ८४ कोटी ३० लाखांची अतिरिक्त मागणी झाली. ही मागणी योग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री नामदार नाईक यांनी ठाणे जिल्हा हा सर्वाधिक लोकसंखेचा जिल्हा असल्याने विविध विकास योजना राबविण्यासाठी वाढीव निधी आवश्यक असल्याचे सांगितले . यावर अर्थमंत्री पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. ग्रामपंचायत जनसुविधा योजना , अपारंपरिक उर्जा , बंदरांचा विकास व प्रवासी सुख सोयी, साकव बांधकाम , जिल्हा रस्ते व मजबुतीकरण, यात्रा स्थळांचा विकास व पर्यटन विकास या क्षेत्रांची विकासनिधीची गरज या अतिरिक्त विकासनिधीमुळे पूर्ण होणार आहे.