जल्लोषाच्या मांज्याला आनंदाचे पतंग !

Posted in News on Jan 28, 2014

‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी

 

नवी मुंबई | प्रतिनिधी

‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन केले.

नवी मुंबईचे कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक विश्व आपल्या विविध उपक्रमांनी समृद्ध करणाऱ्या नवी मुंबई कला संकुल, नवी मुंबई क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत पतंग, मांजा आणि फिरकी असे साहित्य पुरविण्यात आले.

जीवनधाराचे प्रणेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. खा.डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, जेष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक पालिकेतील सभागृहनेते अनंत सुतार, कोपरखैरणेचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तसेच नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेवक सुरेश सालदार, नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक चंद्रकांत पाटील, नगरसेविका इंदुमती तिकोणे, नगरसेविका शिल्पा मोरे, नगसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक रवींद्र म्हात्रे, नगरसेविका शुभांगी सकपाळ, श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, परिवहन समितीचे सदस्य मुकेश गायकवाड आदी  उपस्थित होते. रिमोट कंट्रोल उपकरणाच्या सहाय्याने यावेळी पालकमंत्री ना.नाईक यांच्यावर पुष्पवृष्टी करून यांचे स्वागत करण्यात आले.

पतंग महोत्सव हा संस्कृती जपणारा महोत्सव असल्याचे ना. नाईक म्हणाले. अशाप्रकारे खेळ तणावग्रस्त आयुष्यात विरंगुळा प्रदान करतात असे सांगून महापौर सागर नाईक यांच्या पुढाकाराने जीवनधाराच्या माध्यमातून हा महोत्सव होत असल्याबद्दल महापौरांचे कौतुक केले. कुणालाही इजा होऊ नये यासाठी लोकवस्तीपासून दूर पतंग उडविण्याचा आनंद घ्यायला हवा, अशी सूचना केली. पालिकेतील विरोधकांनाही त्यांनी तोल लगावला. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला दिला. निसर्गउद्यानालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर फेरीवाल्यांकडून जप्त समान ठेवण्यात येते. या सामानाची योग्य विल्हेवाट लावा म्हणजे भविष्यात आग लागण्यासारखी दुर्घटना होणार नाही, असे सांगून महापौर आणि सभागृहनेत्यांना या संबंधात निर्णय घेण्याचे सुचित केले.

गोपाल पटेल हे आणखी एक पतंगप्रेमी अहमदाबाद येथून खास महोत्सवासाठी आले होते. सुमारे ५० फूट आकाराची रिंग प्रकारातील भव्य पतंग उडविण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले.पतंग उडविण्याच्या एका जाहिरातीमध्ये गोपाल यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

डहाणू येथून अशोक शाह यांनी सहभाग नोंदविला. स्टंट, थ्रीडी बॉक्स, टायगर अशा आकाराच्या पतंग उडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.  १५० फूट आकाराची महाकाय पतंगही त्यांनी सोबत आणली होती. त्यांनी उडवलेली पतंगाची साखळी विशेष दाद घेऊन गेली. अशोक शाह यांनी आतापर्यंत एक हजारांपेक्षाही अधिक मुलांना पतंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

महापौर सागर नाईक यांच्या खास आमंत्रणावरून नाशिकच्या येवला या भागातून ३० ते ३५ पतंगप्रेमी युवक या महोत्सवासाठी आले होते. येवला येथे मकर संक्रांतिनिमित्त मोठा पतंग महोत्सव भरत असतो. यांच्याकडे असणारी अनोखी असारी म्हणजेच मांजाची फिरकी त्यांनी दाखवली. या आसरीने एकटी व्यक्ती फिरकी पकडणाऱ्याची साथ न घेत देखील पतंग उडवू शकते. या युवकांनी पतंग काटाकट करण्याची उत्कंठावर्धक प्रात्यक्षिक दाखवून उपस्थीतांना थक्क केले. गुजरातमधील अहमदाबाद येथून इंडिया काईट क्लब संघटनेचे सदस्य नेहूल पाठक यांनी देखील हजेरी लावली. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात त्यांनी यापूर्वी भाग घेतला आहे. याशिवाय राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील त्यांनी पतंग उडविलेला आहे. टूडी, थ्रीडी, निमा फिश, एलईडी लाईट पतंग अशा आकारातील पतंग त्यांनी उडवून दाखविले. याशिवाय रिमोट कंट्रोलने उडणारे पतंग दाखविले.

 

 

आशीर्वादाचा धागा आणि जनतारूपी प्रेमाची हवा

पतंग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर प्रसिद्धी माध्यमांशी पालकमंत्री नामदार गणेश नाईक बोलले. पतंग असो कि राजकारण असो कुठल्याही प्रकारची काटाकाट करायला आपल्याला आवडत नाही. थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि जनतारूपी प्रेमाची हवा यामुळे आपला राजकीय पतंग आकाशात भरारी घेतो आहे, असे ते म्हणाले. नवी मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या समस्यांवर येत्या ६ फेब्रुवारी रोजी विशेष जनता दरबार भरविण्यात येणार असून जनता दरबारातील कामकाजाची माहिती यापुढे लवकरच ………. या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

आंतरराष्ट्रीय सहभाग

पतंग महोत्सवाबद्दल माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबईत काही कामानिमित्त आलेले वांग झोंगा आणि श्रीमती मंगेरा या दोन दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी आवर्जून भेट दिली. महापौर सागर नाईक यांच्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून या महोत्सवविषयी कळल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube