कोकण पर्यटन म्हणून विकसित होत आहे
Posted in News on Mar 7, 2014
कोकण विकास मराठा सेवा संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात
कोकणातील माणूस हा बाहेरून फणसासारखा काटेरी असला तरी आतून मात्र तो रसाळ असतो. त्यामुळेच कोकणी माणसाची विचारधारा आणि कर्तृत्व ओळखले जाते. आजवर विकसित असणारा कोकण आता पर्यटनातून पुढे येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी कोकण विकास मराठा सेवा संघाच्या आयोजित स्नेहसंमेलनाप्रसंगी केले. कोकणाच्या विकासासाठी आपण यथोचित सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण विकास मराठा सेवा संघाचे २३ वे वार्षिक स्नेहसंमेलन व कोकण विकास मराठा सेवा संघाचा कोकण भूषण पुरस्कार सोहळा ऐरोली येथील हेगडे भवन सभागृहात काल बुधवारी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कोकण भूषण पुरस्काराने रणजित खानविलकर यांना पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. संदीप नाईक, आ. अलका देसाई, महाराष्ट्र पेट्रोलियम कार्पोरेशनचे अध्यक्ष चंदू राणे, मराठा समाजाचे नवी मुंबई अध्यक्ष विजय कदम, मुलुंड मराठा समाजाचे अध्यक्ष रमेश शिर्के आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणासारख्या खडकाळ भागात केळीची लागवड करून त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वैयक्तिक उत्पादन रणजित खानविलकर यांनी पोहचवले आहे. शासनाच्या माध्यमातून सेंद्रिय खताद्वारे कोकणात शेतीला पूरक असे वातावरण निर्माण करून खानविलकर यांनी कोकणाची वेगळी ओळख केली आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना किंबहुना तरुणांना पारंपारिक शेतीकडे केंद्रित केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत कोकण विकास मराठा सेवा संघाने त्याला मानाचा कोकण भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. आपल्या सन्मानार्थ मनोगतात त्यांनी नव्या पिढीसाठी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले.
आजचा तरुण शेतीकडे का जात नाही, कारण त्याला चिखलात जायला आवडत नाही. पण आजच्या घडीला तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर नेमकी कशा प्रकारे शेतीतून विकासाची गंगा उंचाविता येईल या विषयी रणजित खानविलकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सेवा संघाची माता भवानीचे मंदिर उभारण्यासाठी आपण आर्थिक पाठबळ देण्याचा निर्धार मराठा भगिनींनी यावेळी केला.
कोकणातील समाज बांधव देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आला आणि स्थायिकही झाला. परंतु मुळची गावातील शेती मात्र त्याला विकसित करता आली नाही. कोकण आणि शेती असे समीकरण नसल्याचे बोलले जाते, हे चुकीचे आहे. कोकणातील बांधवांनी सामुदायिक शेतीवर जर भर दिला तर कोकणाचा निश्चितच विकास होईल, तसेच कोकणात हरित क्रांतीची गरज आहे.
– रणजित खानविलकर, शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराचे मानकरी