एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक
Posted in News on Mar 5, 2014
जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार
एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख रुपये मिळणार असून उर्वरित रक्कम जीपीएफ फंडमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आजच्या नेरूळ येथील आगरी- कोळी भवनातील आयोजित जनता दरबारात एनएमएमटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
एनएमएमटी कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारा २८ कोटींचा फरक या कर्मचाऱ्यांना देण्यात आला नव्हता. या सहाव्या वेतनाचा फरक देण्यात यावा, या मागणीसाठी एनएमएमटी श्रमिक सेनेने पालकमंत्र्यांची दिनांक २८ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. या भेटी दरम्यान एनएमएमटी कर्मचाऱ्यांना २८ कोटींचा फरक देण्याचा ठराव मी मध्ये होणाऱ्या महासभेत मंजूर करण्यात येईल,असे निर्देश दिले आहेत. एनएमएमटी कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल जनता दरबारात एनएमएमटी श्रमिक सेनेने पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे आभार मानले. सिडको आणि महापालिका अंतर्गत येणारे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आजच्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना दिले आहेत. जनता दरबारात बेलापूर ग्राहक संस्थेने इमारतीसाठी ओसी मिळत नसल्याची तक्रार केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून या ओसीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. फौजदारी तक्रारीही आजच्या जनता दरबारात मांडण्यात आल्या. त्याचप्रमाणे रोजगार संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून नोकरीसाठी आलेल्या अर्जावर कारवाईचे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. याप्रसंगी जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. पत्तीवार, कामगार नेते अशोक पोहेकर, सिडको अधिकारी श्री. देशमुख, पोळीचे अधिकारी श्री. मजगे, तहसीलदार विकास पाटील आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.