आंतरधर्मीय संवाद परिषद

Posted in News on Mar 6, 2014

आंतरराष्ट्रीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे प्रतिपादन

 

आंतरधर्मीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळून त्याचबरोबर सदभावनाही वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये आयोजित आंतरधर्मीय संवाद परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हि परिषद नवी मुंबईच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ गुरुद्वाराने आयोजित केली. त्यावेळी पालकमंत्री ना. गणेश नाईक हे उपस्थित होते. राज्यपाल के. शंकरनारायणन पुढे म्हणाले की,महाराष्ट्र आणि पंजाब राज्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. दोन्ही राज्यांना देशभक्तीची आणि समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. गुरुनानकजी यांनी सांगितलेला समतेचा, सर्वधर्म समभावाचा संदेश आजही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीय एकात्मता मजबूत आहे.
या देशात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तसेच हा देश लोकशाहीत प्रगतीशील असून एकात्मता, लोकशाही आणि शांतता येथे नांदत आहे. त्यामुळेच आंतरधर्मीय संवादाला विशेष महत्व आहे. यावेळी विविध धर्मातील थोर अभ्यासक यांनी आंतरधर्मीय संवादाबाबत आपली मते मांडून देशाच्या विकासासाठी समानता, बंधुत्व, एकोपा या गोष्टींचे महत्व विशद केले. या परिषदेला विविध प्रांतातून मोठे धर्मशास्त्राचे अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबई हे सर्व धर्मियांचे आवडते शहर आहे.याठिकाणी या शहराच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिले आहे. लोकशाही मजबूत बनण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होण्यासाठी अशा आंतरधर्मीय संवादाची विशेष गरज आहे. ना. गणेश नाईक पालकमंत्री, ठाणे जिल्हा

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube