Jeevandhara

 

‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ

 

२३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या

युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक

नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्यावतीने कोपरखैरणे सेक्टर ७ मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक -३१ व ३२ च्या पटांगणात आज आयोजित केलेल्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर -२०१४ ‘ चा लाभ तब्बल ७ ते ८ हजार उमेदवारांना झाला. तर २३८७ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळाल्या. नवी मुंबईतला हा ४ था रोजगार मेळावा यशस्वीपणे आणि शिस्तबद्धपणे पार पडला. पालकमंत्री नामदार नाईक यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित युवा वर्गाला पालकमंत्री ना. नाईक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मेळाव्याचे आयोजक आणि जीवनधारा रोजगार, व्यापार आणि उद्योग समितीचे मुख्य समन्वयक आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, नगरसेवक, नगरसेविका, ‘ जीवनधारा ‘ वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार, उद्योग तसेच ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत अन्य समित्यांचे पदाधिकारी, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आजवर शिक्षणात क्रांती झाली आहे परंतु योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकांना पदवी धारण करूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या वाटा शोधणाऱ्या इच्छुक तरुण- तरुणींमध्ये निराशा येत असे. बेरोजगारीची  गंभीर समस्या पाहता ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत रोजगार,व्यापार आणि उद्योग समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यातून आजवर हजारो युवक- युवतींना रोजगार मिळाला आहे, हि एक यशाची गुरुकिल्लीच आहे. बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरून आत्मविश्वासाबरोबरच नैतिक शक्ती देखील युवकांनी आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यापारी वृत्ती असणाऱ्या युवकांकरिता स्वतंत्र रोजगार केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उमेदवारांना यशस्वी मुलाखतीसाठी मेळाव्यात बहुमुल्य मार्गदर्शन केले. मुलाखतीच्या तयारी विषयीची मार्गदर्शन पुस्तिका वितरीत करण्यात आली. सुप्रसिद्ध समुपदेशक सुनील रायकर यांनी उमेदवारांना करियरविषयी उपयुक्त आणि सोप्या भाषेत उमजेल, असे मागदर्शन केले. ‘ मेगा जॉब फेअर २०१४ ‘ ज्याठिकाणी  भरणार होता त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक- ३१ व ३२ च्या प्रवेशद्वारावर एक मोठा मार्गदर्शक माहिती फलक उभारण्यात आला होता. त्यावर ‘ जॉब फेअर ‘ मध्ये सहभागी कंपन्यांची नावे, त्या कंपन्यांमधील उपलब्ध पदे, त्यांना देय असलेले वेतन आदींचा सविस्तर तपशील या सूचना फलकावर देण्यात आला होता. त्यामुळे रोजगार मेळावा स्थळी प्रवेश करतानाच उमेदवाराला आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याची माहिती मिळाल्याने मदतीचा हात मिळाला. या अभिनव संकल्पनेचे पालकांनी कौतुक केले.

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube