शिळफाटा – महापे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा

Posted in News on May 21, 2014

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश – नुकसान ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार

dada 1 

नवी मुंबई महानगर पालिका परिक्षेत्रातील शिळफाटा ते महापे ( एमआयडीसी ) येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी वनखात्याच्या जमिनी बाबतचे सर्व अडसर दूर करून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्याचे निर्देश ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण प्रश्नांबरोबरच मुरबाड ग्रामीण भागात पडलेल्या वळव्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने तयार करून पुनर्वसन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वेलरासू यांना आज दिल्या.

 

ठाणे जिल्हा नियोजन समितीची विशेष आढावा बैठक ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी पी. वेलरासू , ठाणे जिल्ह्याचे पालकसचिव के.पी.बक्षी, राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सारिका गायकवाड , आ. संदीप नाईक , आ. विवेकभाऊ पंडित, आ. गणपत गायकवाड, आ. रमेश म्हात्रे, आ. बालाजी किणीकर , माजी आ. रामनाथ मोते, नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अध्यक्ष, महापालिकांचे आयुक्त आणि अधिकारी वर्ग व सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत जिल्हा वार्षिक आणि समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित उपाय योजना विभागाचा मार्च -२०१४ चा वार्षिक खर्चाचा अहवाल , मागील बैठकीतील इतिवृत्तांताला मान्यता देणे, मान्सून पूर्व करावयाची कामे, इतर विषयांना मंजुरी देणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, वाडा, जव्हार अशा ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या वणव्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पालकमंत्री ना. नाईक यांनी ग्रामीण भागात झालेल्या नुकसानात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगत या ठिकाणच्या नागरिकांच्या नुकसानीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

 

या बैठकीत ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून शिळफाटा ते महापे रस्त्याच्या डागडुजीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर या ठिकाणी वनविभागाची असणारी जमीन हस्तांतरित न झाल्याने सदर रस्त्याचे काम रखडल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आले. आ. नाईक यांनी वनविभागाच्या विषयक असणारा अडसर दूर करून सदरचे काम युद्धपातळीवर मार्गी लावण्याची मागणी केल्यावर या ठिकाणी असणारा अडसर दूर करून येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नवी मुंबईतील करावे गाव , ऐरोली व इतर जेतींचा विकास करण्यासाठी आ. संदीप नाईक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत या विषयी देखील चर्चा करण्यात आली . या बाबत येत्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. नाईक यांनी संगत्जीळाधीकार्यांच्या समवेत एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.

 

सदस्य अशोक पोहेकर यांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाला ७५.५० लाख रुपये खर्चून संरक्षक कुंपण घालण्याच्या कामाचा आढावा जाणून घेत मेंट हॉस्पिटल येथे नवीन शासकीय रुग्णालय संदर्भातील बाबींचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री ना. नाईक यांनी जिल्हाधिकारी वेलरासू आणि पालकसचिव के. पी. बक्षी यांच्या माध्यमातून याची सोडवणूक करण्याकरिता मंत्रालयीन स्तरावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. शहरात इमारतीची निर्मिती होत असताना त्या बांधकाम व्यवसायिकाला सीसी देताना सर्व नियमावलीची पूर्तता केल्याचे पाहूनच सीसी प्रमाणपत्र देण्याचे सक्त आदेश यावेळी पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube