बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा

Posted in News on Aug 13, 2014

बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन

13-8

आता आरोग्य केंद्र स्वरुपात असलेल्या जीर्ण इमारतीच्या पूर्णत्वास अजून काही कालावधी जाणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी सुरु करण्यात येत असलेली बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणार आहे. इतर नागरी सुविधांप्रमाणेच आरोग्य सुविधेचाही विकास करण्यासाठी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महानगरपालिका रुग्णालये उभारत असून या ठिकाणी रोजगारासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशी सूचना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली.

आजची नवी मुंबई ही पूर्वीची ठाणे बेलापूर पट्टी असून बेलापूर गावाला पूर्वापार महत्व आहे. येथील बाजारपेठ ही या पट्टीतील मुख्य बाजारपेठ होती व इतिहासकालीन व्यापारउदिमाचे गाव म्हणून बेलापूर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जिल्हा परिषद कालीन आरोग्य उपकेंद्र व नंतर आरोग्य केंद्र स्वरुपात असलेली जीर्ण इमारत नव्या सुंदर स्वरुपात महानगरपालिकेने उभी केली असून पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सज्ज होत आहे ही आनंदाची बाब आहे, बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी बेलापूर येथे व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर गाव येथील माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत सुरु करण्यात येत असलेल्या बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) सुविधा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ना. गणेश नाईक तसेच महापौर सागर नाईक, आमदार गणपत गायकवाड, उप महापौर अशोक गावडे, डॉ. संजीव गणेश नाईक , स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, अ प्रभाग समितीच्या अध्यक्ष शैला नाथ, ब प्रभाग समिती अध्यक्ष स्नेह पालकर, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रभाकर भोईर, फ प्रभाग समितीच्या सभापती स्वाती गुरखे, कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उप सभापती शिल्पा मोरे, नगरसेवक अमित पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवार, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, सह शहर अभियंता जी.व्ही.राव तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
महापौर सागर नाईक याप्रसंगी म्हणाले कि, अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजानंतर आरोग्य व शिक्षण या महत्वाच्या गरजा असून याकरिता महानगरपालिका कटिबद्ध आहे. यामुळेच नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहू नयेत यादृष्टीने बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचप्रमाणे गुरुवार दिनांक. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. सेक्टर ३, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी) शुभारंभ नागरिकांचे आरोग्य हित जपनुकीच्या दृष्टीने संपन्न होत आहे.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter