धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करणार

Posted in News on Jul 19, 2014

पालकमंत्री  ना.  गणेश  नाईक  यांचे अभिवचन

नवी मुंबईतील धनगर समाज प्रतिष्ठान आणि मल्हार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२ वी, पदवीधर तसेच एमपीएससी व युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि यशासाठी योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नेरूळ येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गणेश नाईक यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता आपण करू, असे अभिवचन दिले.

ScreenHunter_50 Jul. 21 23.22

सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर १० वी, १२ वी आणि एमपीएससी व युपीएससी पदवीमध्ये यशस्वीरित्या उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत गोरड यांनी नुकत्याच विविध परिक्षेत चांगले गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. विविध परिक्षेत दिवस-रात्र अभ्यास करून उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या दिवशी मोठ्या प्रमाणात समाधान दिसून आले.

यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक पोहेकर यांनी धनगर समाजाची गणना आता अनुसूचित जातींमध्ये करण्यात यावी व या समाजासाठी नवी मुंबईमध्ये आहिल्याबाई भवन उभे करावे, जेणेकरून आजच्या काळात धनगर समाजातील विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ तयार होईल, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडे केली.

अशोक पोहेकर यांनी केलेल्या मागण्यांवर भाष्य करताना ना. गणेश नाईक यांनी धनगर समाजाच्या विविध समस्या जाणून घेऊन धनगर समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य वितरण मंडळाचे चीफ जनरल मॅनेजर संदेश हाके, कोकण विभागीय अधिकारी जगन्नाथ वीरकर, सहाय्यक आयुक्त राजेंद्र सरोदे, एस. टी. महामंडळाचे ज्येष्ठ अधिकारी मुकुंद बंडगर, नगरसेवक सुरज पाटील, आयसीएल महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश यमगर, उत्पादन शुल्क विभाग ठाणे जिल्ह्याचे अधिक्षक मनोहर अनसूळे, नगरसेविका स्वाती बुरके आदी मंडळींनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महादेव अर्जुन, उपाध्यक्ष भास्कर यमगर, उपाध्यक्ष श्यामराव आलदर, उपाध्यक्ष अण्णासाहेब मुढे, देवाप्पा लवटे, दत्ताजी व्हावळ, मनोहर बंडगर, संतोष पळसकर, संजय खर्जे,शरद लुबाळ यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत गोरड यांनी केले तर आभारप्रदर्शन खजिनदार संजय गारळे यांनी केले.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter